twitter button

आठवणीतल्या गोष्टी: अगडमबगडम (भाग 2)



0 comments
 Click here to read the previous part.

मग हा बुटका त्याच्या खरखरीत आवाजात तिला सांगतो, "मला माहित आहे तू संकटात आहेस! मी तुला मदत करू शकतो. मला सांग काय त्रास आहे तुला आणि मी तुझी मदत करतो."
मुलगी आणखीनच घाबरते अन म्हणते, "मला असं काही त्रास नाही कि मला तुझी मदत लागेल"
"विचार कर, मी गेलो निघून...तर मग तू जाशील तुरुंगात आणि तुझ्या बाबाची जीभ जाईल छाटली," अशी आठवण,
बुटका करून देतो तिला. मुलगी विचारते, "तू कोण आहेस? तुला हे सर्व कसे ठाऊक?"
"ते तुला समजायची गरज नाही. ह्या गवतातून सोन्याचे धागे बनवणे गरजेचे आहे आत्ता"
"तू जादुगार आहेस का? मला तू मदत करशील का?"
बुटका म्हणतो, "मला जादू येते, होय. मी तुला मदत करेन, होय.....पण मला परत काय मिळणार होय?" "या संकटातून मला आणि बाबांना वाचाव. तुला पाहिजे ते देऊ, सोने, चांदी, कपडे, वाट्टेल ते," असे वचन मुलगी देते. "मी तुझी मदत करेन, आणि मला काय हवंय तुझ्याकडून, ते, मी, वेळ आली कि मागेन तुझ्याकडे. बघ, नीट विचार कर, नंतर 'नाही' म्हणता येणार नाही होय. नाही म्हणालीस तर जादू करेन आणि तुला त्रास देईन. खरं बोलतोय मी. ही
थट्टा नाही होय. कि खोटं नाही होय."
 

 "ठीक आहे. तुला पाहिजे तेव्हा, आणि पाहिजे ते, मी देईन. नाही म्हणणार नाही. आता मला या संकटातून सोडव".
हे ऐकल्यावर बुटका खिश्यातून एक जादूची पावडर काढतो अन तिच्यावर फुंकतो. वास येताच, मुलगी झोपून जाते.
एकदम दुसऱ्या दिवशी उठते. तर पाहते काय. सोन्याच्या धाग्यांच्या रिळांचा ढीग. तिला समजत. काल जे झाले, ते स्वप्नं नसून, खरे होते. दास्या येतात अन तिला राजा समोर नेतात. राजा अन त्याचे वझीरही आश्चर्यचकित झाले असतात. पण आज्ञा पूर्ण केल्यामुळे ते तिला तुरुंगात नाही टाकू शकत आणि तिला घरी जायची परवानगी देतात. घरी तिचे बाबा काळजीत असतात. तिला सही-सलामत पाहिल्यावर ते खुश होतात. मुलगी आपल्या बाबांना बूटक्याचा  सगळा प्रकार सांगते. थोडे दिवस जातात. बुटका काही येत नाही. म्हणून ते दोघे आणखी खुशीत राहतात.

 पण काही दिवसांने, राजाचे शिपाई येतात, मुलीला महालात घेऊन जायला. ही मुलगी काही चेटूक तर नाही करत ना? हे पहावयास, राजा ने तिला परत बोलावले असते. तीच खोली...तेच गवत...तोच चरखा आणि रात्र. आता मात्र मुलगी बुटक्याचा विचार करू लागते. बराच वेळ होतो, तो काही येत नाही. तर ती हमसून रडू लागते. आणि मग एकदम, अचानक, हवेमधून  बुटका येतो. परत तो-तिला काही हवं ते मागून घेईन या बोलीवर.....मदत करतो.
दुसऱ्या दिवशी राजा, वझीर आणि दरबारी
आश्चर्यचकित होतात. पण कोणी काही बोलू शकत नाही. राजा गिरणीवाल्याला आता महालात बोलावतो, आणि म्हणतो "तू ज्या गोष्टी सांगायच्या, त्या तर खऱ्याच आहेत.बोल तुला काय बक्षिस हवंय"
"माझ्या मुलीला तुम्ही राणी बनवा....या शिवाय मला काही नको," असं गिरणीवाला राजाला आग्रह करतो.
 

"ठीक आहे," राजा म्हणतो, आणि गिरणीवाल्याच्या मुलीचं अन राजाचं लग्न होतं. राजाला जासी राणी हवी असते, तशी ही मुलगी असते. दिसायला सुरेख, आणि न्यायवादी. दोघेही राज्याला मोठे व छान करण्यामध्ये जुंपतात.

पण काही दिवसांपासून
राणीला रात्री, नीट झोप लागत नसते....तिला बूटक्याचे स्वप्नं सारखे पडत असते, अन त्याचे शब्द, "मी, वेळ आली कि मागेन तुझ्याकडे. बघ, नीट विचार कर, नंतर 'नाही' म्हणता येणार नाही होय. नाही म्हणालीस तर जादू करेन आणि तुला त्रास देईन. खरं बोलतोय मी. ही थट्टा नाही होय. कि खोटं नाही होय" तिला सारखे आठवू लागतात. ती बेचैन होऊ लागते. अन एका रात्री, तिला आवाज येतो....फटाका फुटण्याचा आणि आगीच्या चेंडू मधून तोच बुटका बाहेर पडतो. राणी खूपच घाबरते. ती घाबरत त्याला विचारते, " काय हवंय तुला?"
बुटका हसतो, अन म्हणतो "राणी गं राणी, विसरली नाहीस ना गं मला?"
"नाही रे, नाही विसरले तुला. तुला काय हवंय, ते पटकन सांग. सोनं-चांदी-दागिने-पैसे-कपडे, काय हवय तुला?" बुटका नुसता हसतो, म्हणतो, "मला हे काही नको. पण तुला जे बाळ होईल त्याला मी घेऊन जाईन." राणी आणखीनच घाबरते..."असं काय म्हणतोयस? मी माझं बाळ नाही देणार तुला. तू दुसरा काही तरी माग". बुटका चिडतो, राणीला ओरडतो, "नाही म्हणू नकोस. मला राग आला तर तुलाच त्रास होईल. नीट विचार कर राणी, तू वचन दिले आहेस मला. मी काही दिवसांनी परत येईन आणि मग मला काय ते सांग."  


राणी बऱ्याच दिवस विचार करते. काही दिवसांनी तिला कळते कि तिला एक छोटेसे बाळ होणार आहे. सारे राज्य आनंदाने वा उत्सुकतेने बाळाची वाट पाहू लागतो. पण राणी आणखीनच बेचैन होउ लागते. कोणाला काही काळात नाही काय चिंता राणीला सतावते.
 

एके रात्री, सगळे झोपल्यावर, बुटका परत येतो, अन राणीला सांगतो "मी तुझ्या बाळाला घेऊन जाईन. मी तुला त्याच खोलीत भेटेन जिथे तूला गवता मध्ये पूर्वी बसवलं होतं.  तू मला थांबवू नकोस, नाहीतर मी जादू करून सगळं राज्य उध्वस्त करेन". राणी खूप मिन्नतवाऱ्या करते, पण बुटका नाही ऐकत आणि अद्रुष्य होऊन जातो. काही दिवसांनी राणीला बाळ होते. राजाला खूप आनंद होतो. सगळ्या राज्यात तो कौतुकाने बक्षिस वाटू लागतो.

अन एका रात्री, बुटका परत येतो. "राणी, मला माझं बक्षिस हवंय. काही झालं तरी, मी तुझा बाळ नेणार आहे".
"अरे, मी माझ्या बाळाला नीट पहिल पण नाही रे, आज नको नेउस त्याला".
"ठीक आहे. मी उद्या येतो."
राणी असते चतुर. ती विचार करते...कि आपण रात्री परत, बूटक्याशी बोलायचे अन त्याच्या डोक्यातून बाळाचे खूळ काढायचे. दुसऱ्या रात्री, बुटका त्याने सांगितलेल्या खोलीत येतो ,"राणी, मला माझं बक्षिस हवंय. काही झालं तरी, मी तुझा बाळ नेणार आहे".
राणी म्हणते, " माझ्या बाळाला नको नेउस. तुला पाहिजे ते दुसरा काहीही ने."
"नाही मला तुजे बाळच हवंय"
"तू दुसरा काही म्हणशील ते मी करेन...पण माझ्या बाळाला नको नेउस"
"ठीक आहे. मला विचार करू दे"
"बरं, तर राणी....माझं नाव सांग, आणि बाळ तुझ्याकडेच राहील. नाही सांगू शकलीस तर मी नेईन". राणी ला वाटतं, कि बरं झालं...नाव काय पटकन सांगता येईल.
ठरवलेल्या रात्री बुटका येतो...पण राणी काही त्याचं नाव नाही सांगता येत. मग भरपूर विनवण्या करून राणी एक रात्र घेते. तो बुटका तिथून अद्रुष्य झाल्यावर, राणी महालातून चूप-चाप बाहेर पडते. कुठे दिसतोय का बुटका, म्हणून त्याचा शोध घेउ लागते. तर तिला थोड्या दूर हालचाल दिसते....
पुढे जून पाहते तर कोण तरी भराभर चालत जाताना दिसतं. 
 हा बुटका कि काय, हे पाहायला ती आणखी पुढे जाते...तर खरच....बुटका जवळच्या जंगलाच्या दिशेने पळत असतो.
जंगलात पोचल्यावर....एका जुन्या झाडाच्या खाली तो शेकोटी पेटवतो आणि त्या भोवती गाऊ अन नाचू लागतो.


"नाव कसे ममं गमतीचे, अगडमबगडम छान असे
ठावूक नाही कोणाला, कळेल कैसे राणीला
राणीचा त्या बाळाला आणीन मी येथे.


 हे गाणे तो त्याच्या भयानक खरखरीत आवाजात गात असतो. राणी सगळं लांबून पहात असते अन ऐकत असते.  बूटक्याचे नाव कळल्यावर ती खूप खुश होते. परत महालात जावून आरामात झोपते. दुसऱ्या रात्री बुटका परत येतो आणि ठरवलेल्या खोलीत भेटतो, आणि म्हणतो, "राणी गं राणी, सांग माझे नाव काय....नाहीतर तुझ्या बाळाला मी नेतो!"

राणी म्हणते "तुझा नाव.......रघु, कि बाळू कि राम कि श्याम कि राघव कि माधव?"
बुटका खूप खुश होतो. राणीला आपलं नाव ओळखता येत नाही, ह्याचा त्याला आनंद होत असतो, "यातलं एक पण नाही....दे तुझ्या बाळाला माझ्याजवळ"


मग राणी म्हणते, "थांब रे जरा
अगडमबगडम! होय, तुझा नाव आहे ना ते-अगडमबगडम!"
राणीने आपलं नाव ओळखलं, हे समजल्यावर,
अगडमबगडमला धक्काच बसतो. 
अन त्याला खूप-खूप राग येतो. तो ओरडतो, "तू माझं नाव ओळखलस!!! तू माझं नाव ओळखलस!!!" असं म्हणता म्हणता तो तयाचा पाय जमिनीवर जोरात आपटतो आणि काय होतं!! अबबब एक मोठी दरी तयार होते, आणि त्यात अगडमबगडम पडतो....तो पडल्यावर, तो खड्डा एकदम बंद होतो....जणू काहीच झाले नाही असे.

राणी पण सुटकेचा श्वास सोडते आणि कानाला हात लावते...खोटे बोलायचे नाही, लपवायचे नाही, आणि अनोळखी लोकांकडून काद्धी मदत घ्यायची नाही.

0 comments:

Post a Comment

newer post older post

Recent Comments

Search This Blog