MM: तुमच्या कवितेला (तो एक बाप असतो) खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कसं वाटतं?
AT: खरंतर हा जो काही प्रतिसाद आला, तो मला अजिबात अपेक्षित नव्हता. म्हणजे प्रतिसाद चांगला मिळेल, अशी शक्यता वाटत होती, पण प्रतिसादाची जी लाट येऊन आपटली ती खरोखरच प्रचंड होती. एकतर कविता लिहितांना, ती काही छापण्यासाठी लिहिलेली नव्हती. माझ्या बाबांबद्दल मला काहीतरी सांगायचं होतं आणि ते मी सांगितलं, एवढंच. ते एवढ्या साऱ्या मुलांना आणि त्यांच्या आई-बाबांनाही आपलं वाटेल, ही कल्पना मी तरी कशी करणार... पण वाटलं खूप छान.
त्या दिवशी माझा फोन सकाळी १० च्या सुमाराला बंदच पडला. पहाटे सहापासून सुरू झाला होता बिचारा. चार तासांत त्यानं मान टाकली. मेल, ई-सकाळवरच्या प्रतिक्रिया सगळंच एकदम भाराऊन टाकणारं होतं. सकाळी माझ्या बाबांच्या डोळ्यांत पाणी होतं. पहाटेपासूनचे फोन तेच घेत होते ना... (आम्ही सूर्यवंशी असल्यामुळे) २० जून ते आजची १९ जुलै... परिस्थितीत फारसा फरक नाही. अजूनही फोन आणि मेल येतातच. आपण काहीतरी लिहून जातो आणि ते लोकांना एवढं भावतं, हे खूप आनंददायी आहे. फक्त वर म्हटल्याप्रमाणे जबाबदारीही वाटते. अनेकांनी सांगितलं, की तुमची कविता वाचून मी बाबांशी बोललो, काही बाबा म्हणाले, आमच्यातला दुरावा संपला. काही शाळांमध्ये ही कविता शिकवली गेली, काहींनी फ्रेम करून भिंतीवर लावली आणि मला फोटो पाठवले. एक बाबा काही न बोलता फक्त मनसोक्त रडत राहिले... या साऱ्या प्रतिक्रिया म्हणजे मोठी जबाबदारीच वाटते. या कवितेला साहित्यिक मूल्य वगैरे काहीही नाही, हे मला माहिती आहे. उगाच तो आव आणण्यातही अर्थ नाही. मला वाटतं मी एक अव्यक्त भावना व्यक्त केली आणि तिला हा भरभरून प्रतिसाद आला...
MM: अशी कोणती प्रतिक्रिया आहे, जी तुमच्या मना पर्यंत पोचली आणि जी तुम्ही आम्हाला सांगू शकाल?
AT: एकच अशी प्रतिक्रिया नाही सांगता येणार... मगाशी म्हटलं तसं, अनेक प्रतिक्रिया होत्या.... एक प्रतिक्रिया मात्र वेगळी होती. एका आजींनी फोन केला होता. त्या म्हणाल्या तुमच्या वडिलांचं अभिनंदन. ते तसे आहेत, म्हणून तुम्ही असे व्यक्त झालात. तुमची कविता वाचून मी खूप रडले, पण वेगळ्या अर्थानं. असा बाप आमच्या वाट्याला नाही आला. माझा बाप जाऊन ३० वर्ष होऊन गेली, तरीदेखील त्याचा राग येतो... असं सांगून त्यांचे वडिल नक्की कसे होते, हे सांगणारी एक कविता वाचून दाखवली. भयानक होती ती... प्रचंड भयानक. ती त्यांनी मोकळं होण्यासाठी लिहिली होती. आपल्याकडे मनातली प्रत्येक गोष्ट नाही ना बोलून दाखवता येत... त्या म्हणाल्या, कविता करूनही ४० वर्षं झाली असतील. आज पहिल्यांदा कोणालातरी वाचून दाखवली. मला तुमच्याच वयाचा नातू असेल... नवरा आहे, मुलं आहेत, पण कसं वाचून दाखवणार त्यांना, आणि कसं सांगणार माझं दुःख... तुम्हाला सांगावंसं वाटलं... इतक्या वर्षांनी आज मोकळी होतेय...
मी काय बोलणार अजून.
मी काय बोलणार अजून.
MM:तुम्ही नेहमीच कविता करता का? कोणत्या विषयावर कविता करायला आवडतं?
AT: मी कविता नाही करत फारश्या. अधेमधे करतो काहीतरी. विषय वगैरे पण नसतात ठरलेले. मध्ये गूगलच्या स्टेटस मेसेजवर ओळी टाकायचो नियमितपणे..........म्हटलं लोकं काही ना काही टाकत असतात, आपण आपल्याला जे सुचतं ते लिहू...
तेजाळत्या रविबिंबासही ग्रासे छाया एकदिनी,
सूर्यासही लागे पाहा, ग्रहण म्हणती लोक जनी,
महातपस्वी तेजोनिधीला कधी न छाया ग्रासू शके,
डोकाविते बिंब मग त्या छायेसही शोभित करे...
घेऊनी बसता तुझ्या स्मृतीचे मधुररम्य ते चांदतुकडे,
हलकेच आला मंद समीर तो पाहूनी सांगे चोहीकडे,
मम प्रीतीचे कौतुक रंगे अधरलोकी त्या इंद्रपुरी,
जाणूनी उत्कट त्या प्रीतीला इंद्राणीचे भान हरे,
नेत्रही झरते इंद्राणीचे अश्रु मौत्तिक खाली पडे,
जनही विस्मित म्हणती वेडे अवकाळी पाऊस पडे...
सूर्यासही लागे पाहा, ग्रहण म्हणती लोक जनी,
महातपस्वी तेजोनिधीला कधी न छाया ग्रासू शके,
डोकाविते बिंब मग त्या छायेसही शोभित करे...
घेऊनी बसता तुझ्या स्मृतीचे मधुररम्य ते चांदतुकडे,
हलकेच आला मंद समीर तो पाहूनी सांगे चोहीकडे,
मम प्रीतीचे कौतुक रंगे अधरलोकी त्या इंद्रपुरी,
जाणूनी उत्कट त्या प्रीतीला इंद्राणीचे भान हरे,
नेत्रही झरते इंद्राणीचे अश्रु मौत्तिक खाली पडे,
जनही विस्मित म्हणती वेडे अवकाळी पाऊस पडे...
ही दोन उदाहरणं... अर्थात प्रेम हाच काही माझा लिहिण्याचा विषय नाही. ज्यावेळी जे वाटेल ते... मी काही कवी नसल्यामुळे बरं झालंय... जे मला वाटेल ते मी लिहू शकतो. हे सारं माझ्यापुरतंच असतं. मधे मी मृत्यू या विषयावर खूप विचार करत होतो. आत्महत्या का करत असतील माणसं, असं वाटत होतं. म्हणून त्यावरही लिहिलं
MM: ही एवढी सुंदर कविता लिहायला तुम्हाला इंसपिरेशन कुठून मिळालं?
AT: बाबांचा वाढदिवस... खरोखर हेच कारण. होतं काय, आपल्याकडे वडिल आणि मुलगा यांच्यात फारसा मोकळेपणा नसतो. उठलेत का महाराज ? असा त्यांचा प्रश्न आणि आई डॉन किंवा हिटलर किंवा जेलर कधी येणारेत? हा मुलाचा प्रश्न एवढ्यातच हा संवाद (?) थांबतो. त्यात मुलगा थोरला असेल, तर विचारायलाच नको. वरून कितीही आरडाओरडा झाला, तरी प्रेम असतंच. मी काही त्यांना कमी त्रास दिलेला नाही. मी किती मनःस्ताप दिला असेल त्यांना, ते आता जाणवतं.... खरं सांगायचं तर हे कन्फेशन आहे. ते करायला हवं असं मला वाटत होतं, म्हणून मी हे सारं लिहिलं......
MM: तुम्ही ब्लॉग लिहायचात ना? तुम्हाला कोणत्या विषयांवर लिहायला आवडतं?
AT: फकाणा बंद केला मी. आम्ही ऑफिसातले पाच मित्र ब्लॉगर होतो. मग लक्षात आलं की आपण पाचजण साईट चालवू शकतो, म्हणून ffive.in नावाची साईट सुरू केली. त्याच्यावर खूप वेगवेगळे विषय असतात. ही कविता पहिल्यांदा तिथंच टाकली होती. तिथं मी सुडोकू या नावानं लिहितो..
MM: तुमचे छंद काय आहेत? कामातून जरा वेळ मिळाला कि काय करता?
AT: वाचन आणि हिंडणं या दोन गोष्टी प्रचंड आवडतात. पूर्वी मित्रांबरोबर कट्ट्यावर बसायचो. लग्न झाल्यावर बायकोसोबत हिंडायचो. सध्या मात्र मी घरी गेलो की लेक आणि पुतण्या यांच्या तावडीत असतो. आम्ही प्रचंड दंगा, मारामाऱ्या करतो. (ती दोघं मला अक्षरशः धुतात...) मला वाचायला खूप आवडतं. जरा बरं नसल्यामुळे घरी झोपून होतो, तर शांताराम वाचून संपवलं. एकट्यानं फिरायलाही आवडतं मला. तेही उगाचच. कुठे जायचं वगैरे ठरवायचं नाही. बाहेर पडायचं आणि चालायला लागायचं.
MM: कोणते पुस्तक लिहित आहात का?
AT: पुस्तक तर लगेच नाही. मध्यंतरी दोन अनुवाद आणि एक पुस्तक धालं. दुसऱ्या महायुद्धात पोलंडच्या वॉरसॉ घेटोतून २,५०० ज्यू मुलांना वाचविणाऱ्या इरेना सेंडलर हिच्याविषयीचं ते पुस्तक आहे. बाकी सध्या एका पुस्तकाचा अनुवाद सुरू आहे.
MM: आपल्या चाहत्यांना काही संदेश?
AT: मेसेज वगैरे देण्यासारखा नाही मी. ती मोठ्यांची कामं. माझ्या अनुभवाच्या गोष्टी सांगतो... पहिली म्हणजे एक चूक आपल्याला आयुष्यातून उठवू शकते, ही गोष्ट कायम लक्षात असू दे... ती चूक कधी, कोणती वगैरे नाही सांगता येत, पण कमावलेलं सारं गमावण्याची वेळ येते. आणि दुसरी गोष्ट, अशी चूक झाल्याशिवाय शहाणपण येत नाही. त्यातून आपण तगून, पाय रोवून उभं राहिलो, की आयुष्य ही काय चीज आहे, ते पुरेपूर समजलेलं असतं.
आणखी एक... मित्रांनो, बोला. मनात असेल ते सरळ आणि बिनधास्त बोला. बोलायचं राहून गेलं, असं नको व्हायला.
आणखी एक... मित्रांनो, बोला. मनात असेल ते सरळ आणि बिनधास्त बोला. बोलायचं राहून गेलं, असं नको व्हायला.
------------------------------------------------------------------------------
English translation of this interview will soon be up.